सध्या महाराष्ट्रात सगळीकडे मराठा समाजाचे मूकमोर्चे निघत आहेत. कोपर्डी येथील घडलेल्या पार्श्वभूमीवर सर्व मराठा समाज एकत्रित येवून मूकमोर्चे काढतो आहे. परंतु प्रश्न असा आहे की, मराठा क्रांती मोर्चा नव्या सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरेल का? मला याचे उत्तर नक्कीच होय असेच वाटते. ते कोणताही मोर्चा लाखोंच्या संख्येने निघाला म्हणून नाही किंवा या मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्र सरकार हादरले म्हणून सुद्धा नाही. तर जेव्हा जेव्हा एखाद्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण समाज एकसंघ,एकजूटपणे प्रतिकार करतो,उठाव करतो. तेव्हा तेव्हा समाजामध्ये खूप मोठे सामाजिक परिवर्तन घडले आहे, हा इतिहास आहे.
सन 1972 रोजी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ पाव शतक लोटले असताना या संबंध काळात एकीकडे दलितांवर अन्याय अत्याचार होत होते. तर दुसरीकडे या जुलमाला वाचा फोडणारी प्रभावी अशी संघटना दलितांकडे नव्हती. शिक्षण,कायदा,आंबेडकरी विचारधन व चळवळ यामुळे सुशिक्षित दलित तरुणांमध्ये आत्मभावनांची प्रबळ इच्छा निर्माण होत होती. मात्र दलितांना भेडसावणारे प्रश्न सुटत नव्हते. ते अधिकच बिकट व जटील होत होते. अस्पृश्यतेच्या प्रश्नांवर लढा देणारी स्वतंत्र अशी संघटना नव्हती. जाती-अंताच्या प्रश्नावर प्रखरपणे लढणारी संघटना असणे ही काळाची गरज होती.
अखेर डाॅ बाबासाहेब आंबेडकरांवरील असिम श्रद्धा, दलित समाजाविषयी अपार जिव्हाळा, सामाजिक विषमते विरूद्ध पेटून उठलेले संतप्त तरूण त्यामुळे "दलित पॅन्थर" या संघटनेचा जन्म झाला व ती अल्पावधीतच राज्यभर पसरली. गावोगावी पॅन्थरची सभा, बेदरकार भाषणे, गर्दी खेचणारी सभा, मोर्चे, हाणामारी, पोलीस केसेस यामुळे बाबासाहेबांच्या निधनानंतर मरगळ आलेल्या समाजाला "दलित पॅन्थर" ही एक नवी ठिणगी वाटू लागली. येत्या नव्या काळात हिच ठिणगी एका नव्या सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरली.
सध्याचे मराठ्यांचे मूकमोर्चे पाहता हिंसा-अहिंसा सोडली असता इतिहास आपली पुनरावृत्ती करतो हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कोपर्डी येथील घडलेल्या भयानक व माणुसकीला काळिमा फासणार्या घटनेच्या निषेधार्थ इतर संघटना जेव्हा फक्त निषेध व्यक्त करत होत्या तेव्हा सामान्य मराठा समाजाच्या मनामध्ये असंतोष खदखदत होता. या असंतोषाला वाट मोकळी करून दिली ती या मूकमोर्च्यांनी. हा असंतोष किती मोठ्या प्रमाणावर होता याचा प्रत्यय प्रत्येकाला दिसून आला. फरक फक्त एवढाच आहे की, दलित पॅन्थरने हिंसेचा तर मराठ्यांनी अहिंसेचा मार्ग निवडला. लाखोंच्या जनसमुदयाने संपूर्ण राज्यभर मोर्चे काढत त्यांनी आपले प्रश्न, आपले गाऱ्हाणे सरकारपुढे मांडली.
या क्रांती मोर्चाकडे पाहत असताना मनामध्ये प्रश्न येतो की, एवढा सगळा जनसमुदाय एकत्र कसा आला असेल? तेव्हा याचं उत्तर मिळत की, शिवरायांच्या विचारांनी तर तो प्रेरित आहेच परंतु एका लेखकाच्या दोन ओळी सहज आठवतात की,
'जेंव्हा तुमचं आणि आमचं दुखणं जर का एक असेल
तर आपलं मागणं सुद्धा एकच असलं पाहीजे'
हेच दुखणं घेऊन आज मराठा समाज आपलं मागणं मागतो आहे. तेव्हा सरकारने त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा. शेवटी खंत एवढीच वाटते की,
'जेव्हा खरी बोलण्याची वेळ आली आहे, तेव्हाच मूकमोर्चे का?' मला वाटतं जेव्हा या सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरे आपल्याला मिळतील तेव्हा मराठा क्रांती मोर्चा हा एका नव्या सामाजिक परिवर्तनाची नांदी निश्चितच ठरेल.

Comments
Post a Comment