आजकाल जातीच्या-धर्माच्या नावावरुन एकमेकांशी भांडणारी माणसं पाहीली की मनामध्ये सारखा एक प्रश्न येत राहतो की, 'माणसं आपल्या जातीवर जास्त प्रेम करतात की धर्मावर'?
तेव्हा मात्र माझं मत असे आहे की, हा देश माझा आहे, ही जमीन माझी आहे, माझा जन्म या देशात झाला आहे, ज्या समाजात मी जन्मलो, वाढलो त्या समाजाविषयी मला तळमळ आहे. आज मी स्वतंत्र आहे, परंतु गेल्या ५००० वर्षांपासून अगदी काही वर्षापर्यंत तुमच्या धर्माने आमच्या समाजावर धर्माच्या नावाखाली जो काही अमानुष छळ करून भयंकर यातना दिल्या, त्या आम्ही सहजासहजी विसरणे कदापि शक्य नाही.
मी तुमच्या धर्मात जन्म घेतला असेल ही परंतु त्यात ही, मी माझ्या जातीत जन्म घेतला आहे. त्यामुळे येथून पुढे जर का तुमच्या धर्मावर संकट आले तर तुमचा धर्म वाचविण्यासाठी आम्ही येवू या भ्रमात तुम्ही राहू नये.
एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, जेव्हा भेटणारी व्यक्ती परधर्मीय असेल तेव्हा मात्र आपल्यातील धर्म जागा होतो. परंतू जेव्हा ती व्यक्ती स्वधर्मीय असेल तेव्हा मात्र आपल्यातील जात जागी होते. जातीला जात भेटली की सगे-सोयरे तयार होतात पण धर्माला धर्म भेटला की तो धर्मासाठी लढायला सांगतो म्हणून मला धर्मापेक्षा माझी जात प्रिय आहे.
जर तुम्ही आणि आम्ही एक धर्मीय आहोत तर, तुमच्या मुलामुलींची लग्न आमच्या मुलामुलींशी लावून द्या. तेव्हा आपण समजु की, आपण एकधर्मीय आहोत. परंतु असे न करता तुम्ही आमच्या भावना भडकावून फक्त इतर धर्मीयांशी लढण्यासाठीच आमचा वापर करून घेता. म्हणून मला धर्मापेक्षा माझी जात प्रिय आहे.
कमीतकमी माझी जात माझ्या सुखदुखाःत सहभागी तर होते. मी मेल्यानंतर मला मूठमाती देण्यासाठी तरी निदान पुढे येते. मग तुमच्या धर्माचं काय? आम्ही ही हिंदूच आहोत ना? मग इतर आमच्यात सामिल होण्यासाठी का येत नाहीत? पण माझी जात येते. म्हणून मला धर्मापेक्षा माझी जात प्रिय आहे.
तुम्ही म्हणाल की, जातीला धर्म असतोच की, हो! असतो पण तो ही तुम्हीच निर्माण केला आहे. पण एक आहे, हिंदू धर्म कसा असावा हे तुम्ही ठरवू शकता पण जातीने कसे जगावे हे माञ आम्ही ठरवू. कारण हिंदू धर्माचे राजे तुम्ही असाल परंतु जातीचे राजे माञ आम्ही स्वतः आहोत म्हणून मला धर्मापेक्षा माझी जात प्रिय आहे.
उद्या जर का तुमच्या धर्मावर संकट आले नी धर्म बुडायला लागला तर वाईट वाटून घेऊ नका किंवा इतर कोणालाही बोल लावू नका, कारण त्यावेळी तुमचा धर्म भोगत असेल तुमच्याच कर्माची फळे. खरे तर ५००० वर्षांपूर्वीच तुम्ही तुमचा धर्म नामशेष करण्याच्या व्यूहरचना आखून ठेवल्या होत्या. त्यामुळे तुमचा धर्म संपला तरी आश्चर्य वाटून घेण्यासारखे काहीच नाही. तुमचा धर्म संपला तरी एक गोष्ट मात्र संपणार नाही आणि ती म्हणजे 'जात'. कारण एकवेळ या जगातून माणूस संपेल पण जात मात्र कदापिही संपणार नाही. म्हणून मला धर्मापेक्षा माझी जात प्रिय आहे.
एकमेकांची ओळख करून घ्यायची असेल तर, नाव-गावापेक्षा जात फार महत्वाची वाटते. तिथे धर्माला कोणताच थारा नसतो. एकदा का तुमची नी त्यांची जात जुळली की, मग माञ कशाचीच गरज लागत नाही. धर्म जुळला म्हणजे संपले असे माञ कधीच होत नाही म्हणून मला धर्मापेक्षा माझी जात प्रिय आहे.
.......................
संतोष ऐवळे
८६०५६५६१५५
Comments
Post a Comment