नुकत्याच तालुकास्तरीय जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांच्या व्यक्तिमत्व विकास स्पर्धा पार पडल्या. लहान मुलांच्या अंगात असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा व मुलांना त्यांच्यातील असलेली कला व विशिष्ट अशा कौशल्याची तोंड ओळख व्हावी हा व्यक्तिमत्व स्पर्धा आयोजित करण्या पाठीमागचा उदात्त हेतू . सध्याच्या काळात मात्र आपल्या शिक्षण व्यवस्थेला या उदात्त हेतूचा विसर पडला आहे की काय हिच शंका मनामध्ये येते.
व्यक्तिमत्व विकास बालनाट्य स्पर्धेमध्ये तब्बल बारा संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. प्रत्येकजण आपले सादरीकरण इतरांपेक्षा सरस कसे ठरेल याचीच तयारी करत होता. सर्वांचे सादरीकरण झाल्यानंतर उत्कंठा लागून राहिली ती निकालाची. सर्वच संघ, बाल कलाकार , शिक्षक, सहशिक्षक आपल्या निकालाची वाट पाहत होते. परीक्षकांनी निकाल जाहीर केला. या निकालाने साऱ्यांच्याच भुवया ताणल्या गेल्या कारण हा निकाल अनपेक्षित असाच होता. खरं तर स्पर्धेमध्ये तेव्हाच खरी गंमत येते जेव्हा अनपेक्षित निकाल लागले जातात, मात्र या ठिकाणी परिस्थिती भिन्न होती. हे निकाल स्पर्धकांनी केलेल्या अथक परिश्रमाने मिळवले नव्हते किंवा त्यांच्या उत्कृष्ट सादारीकरणामुळे मिळाले नव्हते तर हा निकाल परीक्षकांच्या व शिक्षक, अधिकारी यांच्या मिलीभगत मुळे होता याचीच चर्चा शाळेच्या संपूर्ण आवारात सुरु होती.
तेव्हा मनामध्ये एक शंका येऊन गेली की, समाजामध्ये एक जबाबदार, सुशिक्षित, व प्रतिष्ठित असे नागरिक म्हणून शिक्षकांना आजही मानाचे स्थान आहे. पण त्यांनीच जर का आपल्या थोड्याश्या स्वार्थासाठी लहान मुलांच्या भवितव्याशी खेळत असतील तर त्यांना समाजामध्ये गुरुजी म्हणवून घेण्यात काहीच अर्थ नाही. अशा दीड दोन टक्के शिक्षकांमुळे संपूर्ण शिक्षकी पेशाच बदनाम होत चालला आहे.
जिल्हा परिषद हि स्पर्धा पार पाडण्यासाठी काही नियमांचे बंधन घालून देते. या नियमा अंतर्गत सर्व शाळानीं आपली कला सादर करणे अपेक्षित असते. जर यातील कोणी या नियमांचा भंग करत असेल तर त्या संघास स्पर्धेतून बाद केले जाते मात्र असे असताना देखील नियमांचे उल्लंघन होत असेल व त्याच संघाला त्याच स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळत असेल, तर मात्र शिक्षकांनी आपली वैचारिक पातळी किती खालच्या स्तरावर नेऊन ठेवली आहे याचाच प्रत्येय अशा घटना वारंवार देत राहतात.
या संपूर्ण प्रकारा बाबत तेथील केंद्र प्रमुखांशी संपर्क केला असता, "तुम्हाला OBJECTION घेता येत नव्हते का? आता निकाल दिला आहे आम्ही बदल करू शकत नाही" अशी उत्तरे दिली गेली. जर का एखादा संघ नियम मोडत असेल तर मग परीक्षक त्या वेळी काय करत होते? का त्यांच्याही डोळ्यांवर गांधींची धुंदी चढवली गेली होती काय? असे प्रश्न उपस्थित होतात. पुढे याबाबतीत शिक्षणाधिकारी यांच्याशी विचारणा केली असता "माणूस आहे चुका होतात, एखाद्या वेळेस घ्या समजून अशी लाजिरवाणी उत्तरे मिळाली. परिक्षकांकडे जाब विचारला असता " नियम मोडला आहे मान्य परंतू निकाल आम्ही बदलू शकत नाही! तसे जर झाले तर पुढील वेळेस आम्ही परीक्षणासाठी येन्सर नाही" असे धमकीवजा उत्तर देण्यात आले.
एकूणच काय तर शिक्षक हा वर्ग स्वतःला सुशिक्षित समजण्या बरोबरच आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे इतरांच्या नजरेत येण्यासाठी आम्ही शिक्षक कोणत्याही ठरला जाऊ शकतो असेच हि उदाहरणे सुचवू इच्छितात. शासनाला जर खरंच व्यक्तिमत्व विकास साधायचा असेल तर अशा स्पर्धा निःसंशयी व पारदर्शक वातावरनामध्ये पार पडायला हव्यात नाहीतर इतर सुशिक्षित अधिकारी वर्ग हातात सत्ता येताच तो जसा पिसाळतो व भ्रष्टाचार करत सुटतो तसे या शिक्षकांचे होऊ नये एवढीच इच्छा! नाहीतर नंतर आम्हालाही म्हणावे लागेल
" मास्तर तुम्ही सुद्धा....!!!"
~किरण ऐवळे
Comments
Post a Comment